
लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :-कोल्हापूर जिल्हातील जयसिंगपूर मध्ये काही
दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फक्त 1199 रुपयांत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा असा संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होता.या संदेशावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत पैसे जमा केले.मात्र हा सर्व प्रकार बोगस असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.सदर बनावट ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी जवळील आश्रय हॉटेल येथे सुरू असल्याची माहिती मिळताच आरटीओ आणि शिरोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्यांची नावे जमिर मैहबुब सय्यद वय २९ रा.तुकाराम महाराज मंदिराजवळ,टाकळी, ता करमाळा जि. सोलापूर) आणि प्रविण राजाराम गायकवाड (वय ४०,रा.गायकवाड मळा,तेरवाड,ता. शिरोळ) अशी आहेत.प्राथमिक चौकशीत दोघांनी बनावट लायसन्स बनविण्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपींकडून काही बनावट कागदपत्रे,संगणक साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.शिरोळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.आरटीओ कार्यालयाकडून नागरिकांना कोणत्याही खाजगी ठिकाणी किंवा व्यक्तीकडे कागदपत्रे न देता थेट शासकीय माध्यमातूनच लायसन्स प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणूक करणाऱ्या बनावट जाहिरातींना बळी न पडण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.













