निवडणूक कालावधीत कोल्हापूर व इचलकरंजीत तीन दिवस दारूविक्रीस मनाई*
कोल्हापूर : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी
कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी (राज्य उत्पादन शुल्क), कोल्हापूर यांनी दारूविक्रीबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार निवडणूक काळात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.



निवडणूक कार्यक्रमानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस असे १४, १५ आणि १६ जानेवारी २०२६ या कालावधीत कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत संपूर्ण दिवस मद्यविक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम १४२ अंतर्गत घेण्यात आला असून, या कालावधीत मद्य व ताडी विक्रीसाठी शासनाकडून मंजूर केलेले सर्व घाऊक व किरकोळ परवाने (अनुज्ञप्त्या) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. हा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केला असून, निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












