April 18, 2026 1:40 am

मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन — मनोरम्य मनोगत

सोलापूर येथील लोकहिरा प्रतिनिधी :- गणपती शिंदे

Oplus_131072
विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना साहित्यिक ना.म. शिंदे
जाहिराती साठी संपर्क 7276756577

🔹’आताच पत्रकार परिषद झाली.मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात तुमचा गौरव सत्कार करणार आहेत’

    बाहेर गावी राहून ज्या सोलापूरकरांनी साहित्य,कला क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. अशा व्यक्तिंना आमंत्रित करून सत्कार करण्याचे ठरले आहे असे मला कवी मारूती कटकधोंड यांनी फोन करून सांगितले.

     दुसऱ्या दिवशी सोलापूर विद्यापीठाच्या डॉ.शिवाजीराव शिंदे यांनी मला वर्तमान पत्रातील बातमी पाठवली.आणि २५ डिसेंबरला समारंभ आहे असे सांगितले.

  नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात  

‘ना.म.तुमचा साहित्य क्षेत्रातील आढावा पाठवा.’असा माझे मित्र विधीज्ञ वखार अहमद बशीर खान यांचा फोन आला होता. मी ‘ कशासाठी ‘असे विचारले तेव्हा तो म्हणाला की ‘ आमचे मनोरमा बॅकेचे श्रीकांत मोरे साहेब ही साहित्यिक आहेत,त्यांना दाखवायचे आहे.

     गेल्या ४० वर्षांपासूनच्या या माझ्या मित्राला मी कवी लेखक आहे याचे नेहमीच अप्रूप आहे हे मला माहित होते. म्हणून मी माहिती पाठवली होती.

    माझा सत्काराची बातमी कळल्यावर ॲडव्होकेट डब्ल्यू.बी.खान यांनीच माझे नाव सुचवले असे लक्षात आले.पण त्या बाबतीत त्याचा फोन काही आला नाही.

      ४ दिवसांवर कार्यक्रम आला आणि मला संबंधितापैकी कोणाचाच फोन आला नाही.मी सोलापूरला जाण्याबाबत द्विधा मन:स्थितीत होतो.मी खानला फोन केला. 

‘ अरे यार,मी सातारा येथे आहे.तुला कळावायचे माझ्याकडून राहून गेले.तु नक्की ये.’

     खानशी माझे बोलणे झाले त्यानंतर थोडयाच वेळात मला एक फोन आला.

     ‘ ना.म.शिंदे का ‘

    ‘ हो.बोला ‘

    ‘ मी श्रीकांत मोरे बोलतोय.आमच्या मनोरमा परिवाराकडून साहित्यसंमेलनात तुमचा गौरव सत्कार करणार आहोत.समारंभाला निश्चित या.’

   हे Horses mout ऐकले. 

एरव्ही ही सोलापूरला जाण्यासाठी रेल्वे रिझर्व्हेशनची मारामारी.रिझर्वेशन काही कन्फर्म झाले नाही.२४ तारखेला सकाळी बाय रोड निघालो.सोलापूरला घरी पोहचेपर्यंत सायं.६ वाजले.होते.

 मी कुठपर्यंत पोहोचलो यावर  वखार खान लक्ष ठेवून होता.

   सांयकाळी सात च्या दरम्यान तो माझ्या घरी आला. खान मला सांगत होता.

     ,” श्रीकांत मोरे हे मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आहेत.शासकीय उच्चपदस्थ अधिकारी होते. मातृ पितृ भक्त असलेल्या श्रीकांत मोरे यांनी सेवानिवृती नंतर १९९७ साली मनोरमा बॅंकेची स्थापना केली. पेशाने शिक्षक असलेले त्यांचे वडील सदाशिवराव मोरे हे वयाच्या ८१ व्या वर्षी मनोरमा बँकेचे संचालक अध्यक्ष झाले होते.’ हे ऐकून मी अचंबित झालो.

    शिक्षकी पिंड व कवी मन असलेल्या श्रीकांत मोरे यांनी साहित्य क्षेत्रात ही भरारी मारली आहे.त्यांचे २२ कविता संग्रह,३ कथासंग्रह व ५ ललित लेख संग्रह प्रकाशित झाले आहेत.साहित्यावर जीवापाड प्रेम करणारा हा माणूस,यांनी २००६ साली पहिले साहित्य संमेलन भरविले.आता पर्यंत सोलापूरात ६ संमेलने व २४ कवी संमेलने भरविली.” अशी माहिती देताना खान म्हणाला,” एकदा मी सहज तुझा विषय काढला. तेव्हा त्यांनी तुझी माहिती मागितली आणि तु ही नामवंत लेखक साहित्यिक आहेस, सोलापूरच्या बाहेर राहून नाव लौकीक कमावले याचे त्यांना कौतुक वाटले म्हणून त्यांनी ” तुझा गौरव सत्कार करण्याचा निर्णय घेतला.” असे मला खानने सांगितले.

  मी आणि खान ‘ हॉटेल बालाजी सरोवर ‘ येथे गेलो. उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती.तेथील हाॅलमध्ये आम्ही पोहोचलो.तेथे लोकांना सुचना देत असलेले मोरे साहेब आहेत असे त्याने मला सांगितले.

     श्रीकांत मोरे यांना हे ना.म.शिंदे अशी माझी ओळख करून दिली.मी त्यांना फुलांचा गुच्छ दिला.आम्ही एकमेकांना हस्तोंदोलन केले.

‘छान झालं,तुम्ही आलात.’वगैरे बोलून मोरे कार्यक्रमाच्या आखणीला गेले.

       पहिल्यांदाच श्रीकांत मोरे यांची भेट झाली होती. मसाप या सोलापूरच्या ग्रुप मध्ये त्यांच्या कविता वाचल्या होत्या एवढाच परिचय.

     पहातां क्षणी एक सत्शील माणूस आहे असे वाटावे असे व्यक्तीमत्व. 

     ‘ उद्या उद्घाटनापासून या ‘असा त्यांनी निरोप दिला.

     मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिक विश्वास पाटील याच हॉटेल बालाजी सरोवर येथे मुक्कामाला आले आहेत असे कळले.

     माझा आणि विश्वास पाटीलांचा साधारणपणे २०-२२ वर्षांपासूनचा परिचय.

ते ज्या सुट मध्ये उतरले होते तेथे गेलो. आमची बर्‍याच कालावधी नंतर‌ भेट झाली.विश्वासरावांना फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केले व सोलापूरला आल्याने स्वागत हि केले.थोडा वेळ आमच्या गप्पा टप्पा झाल्या.विश्वास पाटील नुकतेच अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनास जाऊन आले होते.

‘ उद्या भेटू.शुभ रात्री ‘असा आम्ही निरोप घेतला.

  🔹दि.२५ डिसेंबरला सकाळी १० वा. ” *सदाशिवराव मोरे साहित्य संमेलन सभागृह या संमेलनाच्या ठिकाणी पोहोचलो.

     व्यासपीठ अत्यंत सुबक व देखणे केलेले होते.सनई चौघड्याच्या सूराने वातावरण प्रसन्न झाले होते. श्रीकांत मोरे,सौ.शोभा मोरे,सुमित* मोरे, अस्मिता गायकवाड,ऋचा मोरे पाटील आणि मनोरमा परिवार, पाहूण्याच्या स्वागताच्या नियोजनात होते.

     श्रीकांत मोरे यांनी मला पहिल्या रांगेततील मध्यभागी अत्यंत प्रेमपुर्वक बसविले.

    दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.व्यासपीठावर संमेलनाचे‌ अध्यक्ष विश्वास पाटील आणि निमंत्रित पाहुणे प्रकाश महानवर,मिलिंद जोशी,अनिल सामंत,रविंद्र शोभणे, संभाजीराव काकडे आणि थोड्या वेळाने कवी रामदास फुटाणे आले. स्वागताने समारंभ सुरू झाला.

    काल संध्याकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे जुने स्नेही कवी रामदास फुटाणे यांची भेट झाली होती. हातात स्टिक होती.’मी कसे काय अशी चौकशी केली. ‘बाकी ठीक आहे.डोळ्याचा थोडा त्रास आहे असे ते ‘म्हणाले.

    साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर सगळे मान्यवर थोडक्यात आणि अत्यंत समर्पकपणे बोलले.विश्वास पाटील यांचे अध्यक्षीय भाषणा आधी श्रीकांत मोरे यांनी हातात माईक घेतला.

 “ना.म.शिंदे व्यासपीठावर यावे “असे म्हणत त्यांनी मला बोलावले.मी व्यासपीठाकडे निघालो,

“जातीला जात वैरी “कार ना.म.शिंदे यांचा सत्कार अध्यक्ष विश्वास पाटील यांनी करावे अशी उद्घोषणा झाली.

     व्यासपिठावर श्रीकांत मोरे यांनी हात धरून मला त्यांच्या आणि विश्वास पाटीलाच्या मधोमध उभे केले.”वाह! वाह ! क्या बात है,” असे म्हणत विश्वास पाटीलांनी माझा हात हात घेतला.

     ” विठ्ठल रखुमाईची मूर्ती,शाल श्रीफळ,ट्रॉफी आणि एक झाडाचे रोपटे देऊन विश्वास पाटील आणि श्रीकांत मोरे या दोघांनी मिळून माझा सत्कार केला. टाळ्याचा कडकडाट झाला.

 ” माझ्या गावी सोलापूरात माझ्या ध्यानीमनी नसताना ही मनोरमा परिवाराने माझा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गौरव सत्कार केला.मी आनंदी झालो.

     माझ्या आयुष्यातील हा एक  न विसरता येईल असा मनोरम्य सोहळा झाला.

मी सत्कार घेऊन निघताना ‘ तुम्ही परिचय व थोडक्यात मनोगत सांगा,’ असे मोरे म्हणाले. वेळ बराच झाला होता म्हणून मी अगदी दोन मिनिटे बोललो.

    त्यानंतर विश्वास पाटील यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण झाले.

     दुपारच्या साग्रसंगीत जेवणाचा आस्वाद संमेलनातील सर्वानी घेतला.

     दुसऱ्या सत्रात विश्वास पाटीलांची मुलाखत अश्विनी कोळेकर यांनी घेतली.मुलाखत संपण्याआधी विश्वास पाटील यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले

    ” या सभागृहात माझे जुने स्नेही लेखक ना.म.शिंदे आले आहेत,त्याच्या गाजलेल्या ” जातीला जात वैरी “या कादंबरीच्या नावातच समाजाचे वास्तव आहे.ना.म.शिंदे यांचे  आपण टाळ्यांनी स्वागत करूया.”असे ते म्हणताच तुडूंब भरलेले सभागृह माझ्या साठी टाळ्यानी निनादले.

   विश्वास पाटलासारख्या दिग्गज साहित्यिक व ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी माझा गौरव केल्याने मला काय करावे काय बोलावे कळेना.मी पटकन उभा राहिलो.रसिक माय बाप प्रेक्षकांसमोर उभा राहून दोन्ही हात जोडून नमस्कार केला. विश्वास पाटील,श्रीकांत मोरे यांना ही नमस्कार केला. मंत्रमुग्ध करणारी ही रम्य आठवण साठवणीतील अंतरदाणीत दरवळतच राहील.

     माणसांना जीव लावला की जीवापाड जीव शिव जपणारी माणसे आयुष्यभराची कमाई होऊन रहातात.

    मी वयाच्या १४ व्या वर्षापासून कविता लिहू लागलो होतो. वयाच्या १७ -१८ व्या वर्षी सोलापूर समाचार मध्ये माझी कविता पहिल्यादां छापून आली होती.त्यास ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दै.संचार मध्ये माझी कविता छापून आली की मनी ऑर्डरने ५ रूपये मानधन दिले जात होते.

     या संमेलनाच्या निमित्ताने रविंद्र शोभणे यांची तब्बल ३२ वर्षांनंतर भेट झाली.नागपुरात सौ.आरती मदन कुलकर्णी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मी ( ना.म.शिंदे ) यशवंत मनोहर सर,श्रीपाल सबनीस व रविंद्र शोभणे पाहूणे होतो.

    म.सा.प.पुणे चे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही माझे लिखाण वाचले आहे असे ते म्हणाले. 

     संमेलनात जे विविध कार्यक्रम झाले त्यात रविंद्र शोभणे,डॉ.राजशेखर शिंदे,राजा माने,प्रदीप मोरे, राजेंद्र दास यांचे चर्चासत्र ही उल्लेखनीय झाले.

    मनोरमा परिवाराचे वतीने कवी वैभव जोशी,मनीष अतुल,अपूर्वा जोशी,संदीप काळे डॉ.शिवाजी शिंदे,निळकंठ कदम,शिल्पा देशपांडे,अंजली करंजकर,स्वप्नील साळुंखे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.हा सोहळा म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील मराठी सारस्वतांचा गौरव सोहळाच.

    कवयित्री अस्मिता गायकवाड व संजीवनी वडगावकर यांच्यासह सोलापूरातील ज्येष्ठ कवी माधव पवार,मारुती कटकधोंड, बिराजदार,पदमाकर कुलकर्णी, दनाखे इत्यादीनी आपल्या बहू आयामी काव्य मैफिलने संमेलनात वेगळीच रंगत आणली होती.

       या एकदिवसीय साहित्य संमेलनातील माझ्या मनास भावलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे याची अत्यंत पारदर्शक मुलाखत होय.

     श्रीकांत मोरे आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ.शोभा मोरे यांची मुलाखत जय भाटकर,अश्विनी कोळेकर यांनी घेतली.या मुलाखतीमुळे मोरे कुटुंबीयांच्या आयुष्याचा समृद्ध पट मला ही उलगडला.माणसाने ठरवले तर जगात काही ही असंभव, अशक्य नाही.स्व:ताच्या जिद्दीवर, आत्मविश्वास व अविरत प्रयत्नांच्या बळावर यश मिळवता येते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे श्रीकांत मोरे, कुटुंबीय आणि मनोरमा परिवार म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    माणसे जोडण्याची कला अनेकांना अवगत असते.पण या वेगवेगळ्या माणसांची मोट बांधायचे कसब सगळ्यात असतेच असे नाही.

समारंभाच्या मधल्या वेळात बोलताना, मोरे म्हणाले होते की “आपण दोघे ही सोलापूरचे,मी ही मुंबईत नोकरी केली पण आपली भेट मात्र आता  होत आहे. “चंद्रकांत खरटमल हा माझा वर्गमित्र.त्याला मी आमच्या संचालक मंडळात घेतले आहे असे हि बोलण्याच्या ओघात मोरे म्हणाले.एकूण आमच्या दोघांचे अनेक जन कॉमन मित्र आहेत.

   या संमेलनात गत स्मृतिला उजाळा मिळाला.नव्याने काही ऋणानुबंध जुळले.

    हे संमेलन म्हणजे निमित्तास कारण की ,–

    सहज आठवलं २००६ साली सोलापूर येथे झालेल्या अ भा म सा संमेलनाला विश्वास पाटील आले होते.त्यावेळी  आम्ही विश्वास पाटीलांसाठी सोलापूरी हुरडा पार्टी ठेवली होती,त्यात गो.मा.पवार सर,अरूण खोरे, वामन ओव्हाळ,सुहास सोनवणे,चंद्रकांत खरटमल आणि काही मित्र मंडळी जमलेले होतो.

    श्रीकांत मोरे व मनोरमा परिवाराच्या या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता सोलापूरी हुरडा पार्टीने झाली.

    आम्ही सोलापूरकर ज्वारीच्या पिकासारखे.जिरायती.

हुरड्याच्या हिरव्यागार गुळमट दाण्यासारखे.एक ज्वारीचा दाणा पेरला की ओंजळीत मावणार नाही एवढे मोठे उगविणारे कणिस.

      किती ही चिमणी पाखरं पिकावर येऊ दे.आमची रास ओंजळ शिगोशिग भरलेलीच रहाते.

     श्रीकांत मोरे कवी,लेखक, विचारवंत ,एक कलंदर माणूस : लेखापरीक्षक,बचतीचा भोक्ता,मुद्दलाच ही मुद्दल करणारा, आणि मी:आमच्यात दोघात खूप समान गोष्टी आहेत.

      एक माणूस पेरला की  असंख्य माणसं .

एक एक दाणा – दाण्यादाण्यानी भरलेले कणीस.हेच धरणी मायचे इंगीत. 

    एक दिवसीय मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाने मला मनोरम्य आठवणी दिल्या. माझ्या सोलापूरची असलेली माझी नाळ कायम आहे यांची मला पुन:श्च प्रचिती आली.

              🔸ना.म.शिंदे,

              

       ९८ २० ८४ ६८ ४६.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!