August 6, 2026 12:52 pm

लिंगायत समाजाच्या हक्कांसाठी एल्गार! १० ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण; तारदाळ ग्रामपंचायतीचा जाहीर पाठिंबा

Oplus_131072
Oplus_131072

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

 

लोकहिरा न्यूज तारदाळ प्रतिनिधी राजू टिळंगे

लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी १० ऑगस्टपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाला तारदाळ ग्रामपंचायतीने अधिकृत जाहीर पाठिंबा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण सहकार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामार्फत लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, समाजातील सर्व पात्र बांधवांना महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार असून, १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून त्याच ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील लिंगायत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तारदाळ ग्रामपंचायतीने आपल्या जाहीर पाठिंब्यात म्हटले आहे की, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी या मागण्या अत्यंत रास्त आहेत. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी स्वाक्षरी करून हा जाहीर पाठिंबा दिल्याने आंदोलनाला स्थानिक स्वराज्य संस्थेचीही ताकद मिळाली आहे. त्यामुळे आता शासन लिंगायत समाजाच्या मागण्यांवर कितपत गांभीर्याने निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

-1

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!