


इचलकरंजी (लोकहिरा न्यूज 
प्रतिनिधी):
शहापूर (ता. हातकणंगले) येथील सावली सोसायटी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात शहापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल हँडसेट व मोटारसायकल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत शहापूर पोलीस ठाणे, इचलकरंजी येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४२९/२०२५, बी.एन.एस. कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेंद्र छेडी यादव (वय ४८), रा. सावली सोसायटी, शहापूर, ता. हातकणंगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.०० ते दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे २.३० या कालावधीत त्यांच्या घरात घरफोडीचा प्रकार घडला. फिर्यादी व त्यांची पत्नी जेवण करून झोपले असताना पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र उशीजवळ ठेवले होते. त्याचवेळी ग्रील नसलेल्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल फोन चोरून नेले.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना, शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान विनानंबर मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र, २६ हजार रुपये किमतीचे तीन अँड्रॉइड मोबाईल हँडसेट आणि ८ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची ४एस चॅम्पियन मोटारसायकल असा मुद्देमाल आढळून आला.
सखोल चौकशीनंतर सदर अल्पवयीनांनी सावली सोसायटी, शहापूर येथील घरफोडीची कबुली दिली. त्यानुसार चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री. योगेशकुमार गुप्ता, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (गड विभाग) श्री. आण्णासाहेब जाधव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे व ज्ञानेश्वर बांगर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बांगर करत आहेत.













