कोल्हापूर, : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी
जिद्द, मेहनत आणि देशसेवेचे स्वप्न डोळ्यांत साठवून उचगावच्या सार्जंट शौर्या अश्वीन शिंदे हिने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. 2025 चा प्रतिष्ठेचा “बेस्ट कॅडेट अवॉर्ड” पटकावत शौर्याने हजारो NCC कॅडेट्समध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारी शौर्या ही कोल्हापूर ग्रुपच्या 06 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची NCC कॅडेट आहे. इयत्ता आठवी आणि नववीमध्ये शिक्षण घेत असतानाच तिने NCC चे दोन वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. विविध कॅम्पमध्ये सहभाग घेत परेड कमांडरची जबाबदारी सांभाळत तिने “सार्जंट” ही मानाची रँक मिळवली. त्याचबरोबर “A” सर्टिफिकेट परीक्षेतही उत्तम गुण मिळवत NCC मधील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला “बेस्ट कॅडेट अवॉर्ड” आपल्या नावावर केला.
विशेष म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील सुमारे 200 शाळांमधील जवळपास दहा हजार कॅडेट्समध्ये लेखी परीक्षा, स्पर्धा, स्किल टेस्ट आणि मुलाखतीसारख्या कठीण टप्प्यांतून शौर्याची निवड झाली. त्यामुळे तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
19 मे 2026 रोजी NCC भवन, कोल्हापूर येथे भव्य पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कर्नल विक्रम नलवडे यांच्या हस्ते शौर्याला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कर्नल मानस दीक्षित, ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, सुभेदार मेजर नारायण पाटील आणि कॅप्टन श्रीदेवी पवार उपस्थित होते.
शौर्याच्या यशामागे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आणि कॅप्टन वर्षा मस्के यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका चौधरी, उपमुख्याध्यापिका जमेनीस आणि सौ. साठे यांनीही तिला प्रेरणा व पाठबळ दिले.
लहान वयातच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या शौर्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. हुबळी ते कोल्हापूर हे 230 किलोमीटरचे अंतर तिने अवघ्या 12 तासांत नॉन-स्टॉप सायकलवर पूर्ण केले होते. तसेच नेमबाजीमध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंवत पोहणे, कबड्डी, फुटबॉल, गोळाफेक आणि थाळीफेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांतही उल्लेखनीय यश मिळवले आहे.
“देशसेवेसाठी भारतीय सैन्यात अधिकारी बनायचे” हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शौर्या पुढे वाटचाल करत आहे. तिची ही यशोगाथा आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत असून, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हेच तिने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.













