
हेरवाड विनयभंग प्रकरणाला मोठे वळण! फरार शिक्षक अजित दिवटे पंढरपूरमधून जेरबंद
कुरुंदवाड, लोकहिरा न्यूज वार्ताहर :
हेरवाड (ता. शिरोळ) येथील हेरवाड हायस्कूलमधील कथित विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील फरार संशयित शिक्षक अजित भूपाल दिवटे याला अखेर कुरुंदवाड पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेतले. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला यश मिळाल्याने या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, शुक्रवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या तातडीने अटकेची मागणी आरपीआय, लोक जनशक्ती पार्टी, पुरोगामी संघर्ष समिती, गावकरी तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवत तांत्रिक माहितीच्या आधारे पंढरपूर येथे सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव सानप व अविनाश भोसले यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. संपूर्ण मोहिमेदरम्यान पोलिसांनी गोपनीयता राखत आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी मिळते का आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












