August 3, 2026 4:25 pm

‘मदतीचा हात… पाठीवर थाप’ – संवेदनांच्या स्पर्शाने उजळले गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य

कै. भूषण गुंजाळ स्मृतीप्रित्यर्थ ‘संवेदना भूषण’ उपक्रम उत्साहात संपन्न.


गडहिंग्लज, लोकहिरा न्यूज प्रतिनिधी
“दान म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित करणे होय.” या उदात्त भावनेतून कै. भूषण गुंजाळ यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ कै. भूषण गुंजाळ मित्र मंडळ व संवेदना फाउंडेशन, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मदतीचा हात… पाठीवर थाप – संवेदना भूषण” हा हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम शनिवारी (दि. ११ जुलै) जागृती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
गरजू, अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले आनंदी हास्य, त्यांच्या डोळ्यांत दाटलेले कृतज्ञतेचे अश्रू आणि समाजातील दातृत्वाचा अनुभव देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य ॲड. एम. ए. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, माजी प्राचार्य श्री. तांबे सर, प्राचार्य श्री. उमेश सावंत, डॉ. धनाजी राणे, श्री. संजय हरेर, श्री. सागर पोवार, श्री. संतोष खाडे, श्री. श्रीकांत पाटील तसेच संवेदना फाउंडेशनचे सचिव श्री. संतराम केसरकर उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.कै.केदारी रेडेकर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर चमूने आरोग्य तपासणीचे कार्य पार पाडले, तर गडहिंग्लज तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात संवेदना फाउंडेशनचे सचिव श्री. संतराम केसरकर यांनी “संवेदना भूषण” हा उपक्रम आता केवळ आजरा तालुक्यापुरता मर्यादित नसून गडहिंग्लज, भुदरगड आणि चंदगड या तालुक्यांमध्येही यशस्वीपणे राबविला जात असल्याचे सांगितले. समाजातील कोणताही गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा संस्थेचा दृढ संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे डॉ. सतीश घाळी यांनी संवेदना फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक करताना सांगितले की, “शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगार अशा विविध क्षेत्रांत नऊ स्वतंत्र टीमच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून सातत्याने कार्य करणारी संवेदना फाउंडेशन ही प्रेरणादायी संस्था आहे. भविष्यातही संस्थेच्या प्रत्येक समाजोपयोगी उपक्रमासाठी आमच्या संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील. एवढेच नव्हे, तर या सेवाकार्यात सहभागी होण्याची माझीही मनापासून इच्छा आहे.”
अध्यक्षीय समारोपात ॲड. एम. ए. पाटील यांनी समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने अशा सेवाभावी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, शिक्षक, डॉक्टरांचे पथक, देणगीदार आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी केदारी रेडेकर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, संवेदना फाउंडेशनचे सदस्य, कै. भूषण गुंजाळ मित्र मंडळाचे कार्यकर्ते, देणगीदार, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सागर पोवार यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर, डॉक्टरांचे पथक, देणगीदार, सहकार्य करणाऱ्या संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू आणि उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण झालेली नवी आशा हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. कै. भूषण गुंजाळ यांच्या प्रेरणादायी स्मृतीतून प्रज्वलित झालेली ही संवेदनांची ज्योत भविष्यातही अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञान, आशा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश पसरवत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!