लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:- मारुती शिंदे


शासनाने ग्रामपंचायतीमार्फत आकारण्यात येणाऱ्या निवासी मालमत्ता कर (घरपट्टी) थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयानुसार, १ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकी असलेल्या निवासी करदात्यांना थकबाकी रकमेवर ५० टक्के सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे परिपत्रक जाहीर होऊन तब्बल एक महिना कालावधी लोटला असला तरी खोतवाडी ग्रामपंचायतीकडून अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
तसेच शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होईल, अशी अपेक्षा असताना ग्रामपंचायतीच्या उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थ व मिळकतधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “शासनाने जाहीर केलेली ५० टक्के सवलत आम्हाला द्यायची नाही का?” असा सवाल आता करधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता,संबंधित विषयाबाबत विशेष गावसभेचे आयोजन करू असे टोलवाटोलवीचे उत्तर देण्यात येत आहे. तसेच २४ डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायतीची बैठक असून, त्या बैठकीनंतर गाव सभेचे आयोजन करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन व उडवाउडवीचे उत्तरे संबंधितांकडून देण्यात येत आहे.दरम्यान, शासनाचा स्पष्ट परिपत्रक असतानाही निर्णय रखडल्याने करधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता २४ डिसेंबरच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, ग्रामपंचायत शासन निर्णयाची अंमलबजावणी करून करधारकांना दिलासा देणार का, याकडे ग्रामस्थ उत्सुकतेने पाहत असून संबंधित विषयाबाबत तोडगा न निघाल्यास नागरिक आंदोलन करणार असल्याची चर्चा होत आहे.













