आरक्षण, जातीय जनगणना व निधी वाटपाच्या मागण्यांसाठी समाजाचा एल्गार
लोकहिरा न्यूज



मुंबई : अनुसूचित जाती समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये अनुसूचित जाती (एस.सी.) उपवर्गीकरण ( अबकड ) तात्काळ रदद करावे, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करावे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेला निधी इतरत्र वळवू नये, तसेच समाजाच्या विविध हक्कांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील आझाद मैदान ते मंत्रालय या मार्गावर हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
अनुसूचित जाती समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वरील बातमीस जेष्ट साहित्यिक ना. म. शिंदे यांची प्रतिक्रिया खालील प्रमाणे
गणपती शिंदे,
संपादक,लोकहिरा,
इचलकरंजी,
यांस,
महामोर्चा संदर्भातील पोस्ट वाचली.हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.खरं तर काळाची गरज आहे.
आपल्या कक्कय्या ढोर समाज म्हणवून घेणाऱ्या आणि फुकट फौजदारी करणार्या कोणाला ही सामाजिक व राजकीय भान नाही हे उप वर्गीकरणाच्या प्रश्नाने ही पुन्हा सिद्ध केले आहे.तसे तर कशाचे काही देणे घेणे नाही असे विदारक चित्र आहे.
कोणत्याही परिवर्तनाच्या चळवळीत आपल्या नतदृष्ट लोकांनी कधीच सहभाग घेतला नाही.आज ही घेत नाहीत.याची त्यांना खंत व लाज ही वाटत नाही.
फक्त ग्रूपवर ” अतिशहाणपणा ” करणे व एकमेकांना घालून पाडून बोलणे याखेरीज हे दुसरे काही ही करू शकत नाहीत.
आपले राजकीय नेते ही काही वेगळे नाहीत.
अंतर्गत आरक्षण वर्गीकरणास विरोध करणे हे आज महत्त्वाचे आहे.त्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आपले कर्तव्य आहे.
काही का असेना राष्ट्रीय ढोर समाज संघटना ही अनेक बाबतीत कृतीशील आहे.
आपले लोक काहीच करत नाहीत त्यामुळे राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या कार्यक्रमात आपण सक्रिय पाठिंबा देणे आवश्यक आहे.
उपवर्गीकरणास आपण कायम विरोध केला पाहिजे.
वैचारिक मंथन करून काही वैचारिक विषयावर मतभेद बाजूला ठेवून महत्वाचे सामाजिक विषय सामंजस्याने एकत्रित सोडविले पाहिजेत ही माझी भूमिका तु ही घेतली आहे ते मला योग्य वाटते.
ना.म.शिंदे













