कोल्हापूर, लोकहिरा न्यूज प्रतिनिधि :




सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नैतिक मूल्यांची होत असलेली घसरण थांबवायची असेल तर साने गुरुजींचे विचार आणि संस्कार युवा पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करत जनता नागरी निवारा संघटनेचे अध्यक्ष तथा दलित मित्र साथी शिवाजीराव परुळेकर यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. साने गुरुजींचे जागतिक स्तरावर गौरवले गेलेले “श्यामची आई” हे संस्कारक्षम पुस्तक केवळ पाच रुपयांत उपलब्ध करून द्यावे, अन्यथा ११ जूनपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वीही हजारो पोस्टकार्ड मोहीम आणि पाच हजार सह्यांचे निवेदन शासनाकडे पाठवून ही मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाने केवळ साने गुरुजी विशेषांक प्रकाशित करून या मागणीकडे दुर्लक्ष केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाचे हक्क पुणे विद्यार्थी गृह प्रकाशनाकडे असल्याचे कारण देत जबाबदारी झटकली होती.
मात्र, साने गुरुजींच्या निधनानंतर ६० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने ११ जून २०१० पासून “श्यामची आई” या पुस्तकावरील प्रकाशन हक्क संपुष्टात आले आहेत. त्यामुळे शासनाला हे पुस्तक अल्प किमतीत प्रकाशित करून सर्वसामान्य विद्यार्थी, युवक आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्यात कोणतीही कायदेशीर अडचण उरलेली नाही, असा दावा परुळेकर यांनी केला.
शासन विविध योजनांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करते, मग भविष्यातील पिढीवर संस्कार घडविणाऱ्या साहित्याकरिता काही कोटी रुपये खर्च करण्यास का मागे हटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “लाडक्या बहिणींच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांनी भविष्यात आपल्या पालकांचा आधार व्हावे, यासाठी ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
यासाठी शासनाने किमान १० ते २० हजार प्रती प्रकाशित कराव्यात. त्यापैकी काही प्रती प्राथमिक-माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांना आमदार-खासदार निधी अथवा शैक्षणिक अनुदानातून उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
दरम्यान, ११ जून रोजी साने गुरुजी स्मृतिदिनापासून आंदोलनाची पहिली फेरी सुरू करण्यात येणार असून, पाच हजार पोस्टकार्ड मोहीम, त्यानंतर एक लाख विद्यार्थी व युवकांच्या सह्यांचे निवेदन, आणि तरीही शासनाने दखल घेतली नाही तर राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा निर्वाणीचा इशारा साथी शिवाजीराव परुळेकर यांनी दिला आहे.
“संस्कारांच्या पुस्तकासाठी पाच रुपये खर्च करायला शासन तयार नसेल, तर युवकांसह राज्यभर संघर्ष उभारल्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.













