August 3, 2026 4:25 pm

“कागदोपत्री योजना की निधी उधळपट्टी?” — पत्रकार प्रमोद परीट यांचा थेट सवाल

तारदाळ-खोतवाडी सांडपाणी प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह
“कागदोपत्री योजना की निधी उधळपट्टी?” — पत्रकार प्रमोद परीट यांचा थेट सवाल

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-
तारदाळ, ता. हातकणंगले : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत तारदाळ व खोतवाडी येथे प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत पत्रकार प्रमोद परीट यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला थेट धारेवर धरले आहे. प्रकल्पासाठी निवडलेल्या जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असून, लाखो रुपयांचा निधी केवळ कागदोपत्री उद्दिष्टपूर्तीसाठी खर्च केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात परीट यांनी स्पष्ट केले की, तारदाळ येथे प्रस्तावित ७७१ KLD क्षमतेच्या डीवॅट्स तंत्रज्ञानावरील प्रकल्पासाठी निवडलेली जागा प्रत्यक्षात निष्प्रभ ठरणार आहे. ग्रामपंचायतीने सुचवलेल्या ठिकाणी आवश्यक प्रमाणात सांडपाणी पोहोचतच नसल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर निदर्शनास आणले. अहवालात ४५० मीटर अंतरावर पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला असला, तरी वाटेतच शेतकरी ते पाणी शेतीसाठी वापरत असल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी थेंबही पोहोचत नसल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
याहून धक्कादायक बाब म्हणजे गावातील केवळ २५ टक्के सांडपाणीच प्रस्तावित जागेकडे येते, तर उर्वरित ७५ टक्के सांडपाणी वेगवेगळ्या नैसर्गिक नाल्यांतून वाहून जाते. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी प्रकल्प उभारून संपूर्ण गाव सांडपाणीमुक्त होणार कसे? असा थेट सवाल परीट यांनी उपस्थित केला आहे.
प्रस्तावित जागा ही डोंगरावरून येणाऱ्या पावसाळी ओढ्याच्या पात्रात असल्याने अतिवृष्टीच्या काळात प्रकल्प वाहून जाण्याचा किंवा आजूबाजूच्या मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पाण्याच्या निचऱ्याबाबत अहवालात कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
खोतवाडीतील परिस्थितीही याहून वेगळी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेथील प्रस्तावित जागाही थेट ओढ्याच्या पात्रात असून, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. गावातील फक्त १५ टक्के सांडपाणीच त्या ठिकाणी पोहोचते, तर उर्वरित ८५ टक्के सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा कोणताही आराखडा प्रशासनाकडे नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी तारदाळ-खोतवाडी येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देखभालीअभावी अक्षरशः बंद पडल्याची आठवण करून देत, “नवीन सांडपाणी प्रकल्पाची जबाबदारी नेमकी कोण घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
औद्योगिक वसाहतींनी वेढलेल्या या गावांसाठी प्रथम संपूर्ण गावाची भूमिगत गटार योजना राबवून सर्व सांडपाणी एकत्रित करणे आवश्यक आहे. त्यानंतरच मध्यवर्ती ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास योजना तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या यशस्वी होईल, अशी भूमिका परीट यांनी मांडली.
दोन्ही प्रकल्पांना तातडीने स्थगिती देऊन तांत्रिक समितीकडून फेरसर्वेक्षण करावे, संपूर्ण गावासाठी भूमिगत गटार योजनेचा DPR तयार करून निधी मंजूर करावा आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नव्याने नियोजन करावे, अशा ठाम मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
“माझा विकासकामांना विरोध नाही; मात्र केवळ निधी खर्च दाखवण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्षात गाव सांडपाणीमुक्त होईल असे शाश्वत काम व्हावे, हीच भूमिका आहे,” असे प्रमोद परीट यांनी स्पष्ट केले.
या निवेदनाच्या प्रती संबंधित उपअभियंता, दोन्ही गावांचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!