Oplus_131072प्रवेश सुरूआपल्या पाल्याला माझी शाळेतच
दऱ्याचे वडगावला वादळी वाऱ्याचा तडाखा; १० घरांची पडझड, पिकांचे मोठे नुकसान
आमदार अमल महाडिक यांनी दिले तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
कोल्हापूर: प्रतिनिधी:- गणेश नारायणकर
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दऱ्याचे वडगाव परिसरात काल झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील सुमारे १० घरांवरील छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरांसोबतच परिसरातील शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.
वेगवान वाऱ्यामुळे १० हून अधिक घरांवरील पत्रे आणि कौले उडून गेली. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती घेऊन पीडित कुटुंबांना धीर दिला.
आमदार महाडिक यांनी तातडीने संबंधित महसूल अधिकारी आणि प्रशासनाशी संपर्क साधला. “नुकसानग्रस्त घरांची आणि शेतीची पाहणी करून तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून बाधितांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळेल,” असे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.