राजारामपुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; गहाळ झालेले २० मोबाईल मूळ मालकांना परत

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :-
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत गणपती उत्सव, कॉलेज परिसर, गर्दीची ठिकाणे, बस स्टॉप परिसर तसेच प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या मोबाईल फोनचा यशस्वी शोध घेऊन एकूण ५ लाख ३ हजार रुपये किमतीचे २० अँड्रॉईड मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
२०२४–२०२५ या कालावधीत गहाळ मोबाईल संदर्भात राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या होत्या. सदर गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आदेश दिल्यानुसार, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही विशेष मोहीम हाती घेतली.
सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांच्या सहकार्याने CENTRAL EQUIPMENT IDENTITY REGISTER (CEIR) प्रणालीद्वारे गहाळ मोबाईलचे IMEI नंबर ट्रेसिंग करून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तपासादरम्यान सदर मोबाईल हे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नवी मुंबई, मुंबई तसेच कर्नाटक राज्यातील काही ठिकाणी वापरात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार संबंधित ठिकाणांची माहिती व लोकेशन प्राप्त करून गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी विशेष प्रयत्न करत विविध कंपन्यांचे गहाळ मोबाईल हस्तगत केले. हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश होडगर,पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलिस हवालदार कृष्णात पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप सावंत, विशाल शिरगांवकर, सत्यजीत सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील, सचिन पाटील, नितीश बागडी. यांचा सहभाग होता.
राजारामपुरी पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांच्या तांत्रिक व तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.













