August 3, 2026 5:06 pm

नातेवाईकांनी फिरवली पाठ… पण समाजसेवक ठरले खरे आप्त! निराधार महिलेवर विधीपूर्वक अंत्यसंस्कार

नातेवाईकांनी फिरवली पाठ… पण समाजसेवक ठरले खरे आप्त! निराधार महिलेवर विधीपूर्वक अंत्यसंस्कार
बेळगाव | प्रतिनिधी
रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, पण माणुसकीच्या नात्याने हात पुढे केला… बेळगावातील ही घटना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे.
टिळकवाडी परिसरातील रहिवासी शकुंतला रामचंद्र गडकरी (वय ७०) या पतीच्या निधनानंतर अनेक वर्षे एकट्याच राहत होत्या. गंभीर आजाराशी झुंज देत असताना त्यांना योग्य उपचारही मिळू शकले नाहीत आणि अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
दुःखाची बाब म्हणजे त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील किंवा नातेवाईकांपैकी एकही व्यक्ती पुढे आली नाही. आयुष्यभर जपलेली नाती त्यांच्या अखेरच्या प्रवासातही सोबत उभी राहिली नाहीत.
ही माहिती मिळताच महानगरपालिका सदस्य शंकर पाटील, समाजसेवक गंगाधर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत संपूर्ण अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडत सदाशिवनगर स्मशानभूमीत शकुंतला गडकरी यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.
या प्रसंगातून समाजसेवकांनी दाखवलेली माणुसकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. संकटाच्या काळात रक्ताची नाती दूर गेली, पण समाजातील संवेदनशील हातांनी एका निराधार महिलेला तिच्या अखेरच्या प्रवासात सन्मानाने निरोप दिला.
स्थानिक नागरिकांनी शंकर पाटील, गंगाधर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, ही टीम यापूर्वीही अनेक निराधार व अनाथ मृतदेहांवर विधीपूर्वक अंत्यसंस्कार करून समाजसेवेची परंपरा जपते आहे.
“माणुसकी अजून जिवंत आहे,” याची जिवंत साक्ष देणारी ही घटना प्रत्येकाला अंतर्मुख करून जाते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!