April 18, 2026 4:10 am

समाजाच्या भल्यासाठी सकारात्मक पत्रकारितेची गरज -पद्मभूषण पोपटराव पवार

बीड / लोकहिरा न्यूज प्रतिनिधी 

 

आज समाजाची स्थिती खालावत आहे .लहान लहान मुले गुटक्याच्या व्यसनाधीन होत आहेत. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दहा ते बारा कोटीचा गुटखा विकला जात आहे .शेतकरी हवालदिल आहे. समाजातील सकारात्मक ऊर्जा संपत आहे. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक पत्रकारिता फार महत्त्वाचा विषय आहे. समाजाला योग्य दिशेला नेण्यासाठी पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असून पत्रकारांनी आता आत्महत्येच्या बातम्या सोडून शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या प्रयोगाच्या सकारात्मक बातम्या छापाव्यात. असा आग्रह पद्मभूषण पोपटराव पवार यांनी मराठी पत्रकार परिषद व स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना धरला. यावेळी त्यांनी देवडी हे गाव आदर्श गाव करण्याचा संकल्प केला. यात मराठी पत्रकार परिषदेची महत्त्वाची भूमिका असेल असे यावेळी त्यांनी सांगितले.

 

 या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ अदाटे, आरोग्य विभागाचे प्रमुख दिपक कैतके, मराठी पत्रकार परिषदेच्या मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोषाध्यक्ष मन्सुर भाई शेख,सुनिल लोणकर, डिजीटल मिडीया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, ज्येष्ठ पत्रकार सुभाष देशमुख, शेतीनिष्ठ शेतकरी गोरख झाटे, कल्याण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

 

 यावेळी  पत्रकारांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये संपादक राजेंद्र आगवान, लोकमतचे माजी जिल्हा प्रतिनिधी जगदीश पिंगळे , धुळ्याचे पत्रकार गो.पी. लांडगे, वडवणीचे सुभाष वाव्हळ यांचा सत्कार करण्यात आला.

 पुढे बोलतांना पोपटराव पवार म्हणाले की आज शेतीची स्थिती गंभीर आहे. त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत. आज हवामानात बदल होत आहे. मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस येऊन शेतीचे नुकसान होत आहे. शेतीच्या उत्पादनात घट होत आहे. शहरे वाढत चालली आहेत. मात्र ग्रामीण भागात बकाल अवस्था निर्माण होत आहे. शासनाकडे असे निश्चित कार्यक्रम ग्रामीण भागासाठी नाहीत. ग्रामविकास आणि कृषी विकास साठी निश्चित धोरण निर्माण झाले पाहिजे. या सर्व बाबीसाठी पत्रकारांनी पुढाकार घेऊन सकारात्मकता आणली पाहिजे. शेतकरी आत्महत्याच्या बातम्या कमी आणि शेतातील विविध प्रयोगाच्या बातम्या जास्तीत जास्त छापल्या पाहिजेत. लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी पत्रकारांनी जास्तीत प्रयत्न केले पाहिजेत .मराठी पत्रकार परिषद यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. समाजासाठी विविध आंदोलने परिषदेच्या वतीने होत आहेत. ते करत असताना आदर्श गाव निर्माण करण्यासाठी ही त्यांनी प्रयत्न करावेत. याबरोबर शेतीतील नवीन नवीन प्रयोग लोकांसमोर आणण्यासाठी ही मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विकासाचे व्हिजन विषद केले.   नेत्यांमध्ये विकासाचे व्हिजन असेल तर काम चांगले होते. नितीवान समाजासाठी काम केले पाहिजे असे बोटावर मोजण्याइतके लोक आहेत. जे समाजासाठी काम करतात. हे सांगताना हिवरे बाजार उभा करण्यासाठी 35 वर्षे लागली. हे इथे सांगायला विसरले नाहीत. आज हिवरे बाजारचा कायापालट झाला. मात्र या ठिकाणी येणाऱ्या इतर गावांनी प्रेरणा

फोटो पुजन करीत असताना मान्यवर
महाराष्ट्रातून आलेले संपादक व पत्रकार बंधू भगिनी
पत्रकारासाठी स्वतंत्र आरोग्य कक्षासाठी प्रयत्न करून मंगेश चिवटे
सकारात्मक पत्रकारितेची गरज पद्मभूषण पोपटराव पवार

शेतकरी आत्महत्या नव्हे सिस्टीमचा बळी-:- अमर हबीब

घेऊन काम पुढे चालू ठेवले तर त्याचा उपयोग आहे. आज अनेक लोक हिवरे बाजार मध्ये येतात. मात्र हिवरे बाजार सारखे काम करण्यासाठी प्रयत्न फार कमी लोक करतात असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

 

 पत्रकारांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्षासाठी प्रयत्न करू- मंगेश चिवटे

 

 यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्ष निर्माण करू यातून महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे एक स्वतंत्र कक्ष असेल. याबरोबरच समाजामध्ये अपंगांसाठी आणि कॅन्सर ग्रस्तांसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने अनेक हॉस्पिटल चालू झाल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी एकही रुपया खर्च न करता नागरिकांना सुविधा मिळतात हेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आईच्या नावाने एक सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी उभे राहत आहे ज्या ठिकाणी कॅश काउंटरच नसेल आणि सर्व सुविधा मोफत मिळतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की माझे आजोबा मराठी पत्रकार परिषदेशी जोडलेले होते. माझे वडीलही मराठी पत्रकार परिषदेत काम करत होते आणि मीही आता मराठी पत्रकार परिषदेची जोडलेला आहे. त्यामुळे आता पत्रकारांच्या आरोग्य समस्यांसाठी कधीही गरज पडली तर मला निर्धास्तपणे फोन करा मी तत्पर असेल असे सांगायला ते विसरले नाहीत. याच वेळी त्यांनी देवडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

 

 शेतकरी आत्महत्या नव्हे सिस्टीमचा बळी -अमर हबीब 

आज शेतकऱ्यांची व्याख्या करणे कठीण झाले आहे .अनेक जण शेतीचे मालक असतात मात्र त्यांची उपजीविका व्यापारावर ,नोकरीवर अवलंबून असते .मात्र ज्यांची उपजीविकाच शेतीवर अवलंबून आहे तोच खरा शेतकरी अशी व्याख्या ठरली पाहिजे .आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे.आपण वृत्तपत्रांतून वाचतो एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की शेतकऱ्याची आत्महत्या असी आपण बातमी लिहितो. मात्र त्याच्या पाठीमागची कारण आपण शोधली पाहिजेत एखाद्या शेतकऱ्याची मुलगी सासरी आसतांना ज्या बापाला त्रास होतो आणि पैशाची मागणी होते. त्यावेळी शेतकरी सांगतो बाई कापूस विकल्यानंतर तुला पैसे देईल. मात्र आसमानी संकटापुढे शेतकरी हतबल होतो आणि त्याचा कापूस कधीच येत नाही आणि आला तरी सिस्टीम मुळे त्याच्या कापसाला भाव येत नाही. आणि अशा परिस्थितीत मग त्याला आत्महत्या शिवाय पर्याय राहत नाही या आत्महत्येला सिस्टीमचा बळी असे नाव द्यायला हरकत नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आणते त्यात अनेक त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळणे अत्यंत गरजेचे असतानाही केवळ वेगवेगळ्या घोषणा करणे एवढेच सरकार करते. शेतकरी विरोधी धोरणेच शेतकऱ्याच्या आत्महत्यांना कारणीभूत आहेत असे माझे ठाम मत आहे. याच्या विरोधात आम्ही सातत्याने आंदोलन करतो. त्यासाठी एक दिवस उपवास करतो. या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेने किमान आपल्या पूर्वजांसाठी आपण काम केले पाहिजे. शेवटी शेतकरी टिकला तर देश टिकेल या भूमिकेतून पत्रकारांनी शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सुहास देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी पत्रकार परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आलेल्या पाहुण्या कडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. ज्यावेळेस पत्रकार अडचणीत असतात किंवा आजारी असतात त्यावेळी त्याच्यासाठी कोणीही पुढे येत नाही. जोपर्यंत कामात असतो तोपर्यंत त्याची किंमत ठेवतात. नंतर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. किमान सरकारने तरी पत्रकारांसाठी अशी ठोस योजना आणावी. जो निधी दिला जातो ततो तुटपुंजा  असल्याने  पत्रकारांची पेन्शन योजना असो की आधिस्वीकृती चा प्रश्न असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो याकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या सर्व बाबींसाठी आता सकारात्मक विचार करून पत्रकारांसाठी भरीव मदत करावी अशी अपेक्षा मंगेश चिवटे यांच्याकडून देशमुख यांनी केली. याचवेळी पोपटराव पवार यांच्याकडून आदर्श गाव योजनेसाठी जिथे जिथे तुम्हाला आमची गरज पडेल तिथंच आम्ही  तुम्हाला मदत करू ,कधीही हाक द्या अशी ग्वाही दिली. देवडी सारख्या छोट्या गावामध्ये महाराष्ट्राचा कार्यक्रम होत असताना मुंबईपासून ते गडचिरोली पर्यंत सर्व पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी केले. यावेळी महाराष्ट्रभरातून अनेक ज्येष्ठ पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!