संकल्प माध्यमिक विद्यालयात निर्भय पथकाचे प्रबोधन; विद्यार्थ्यांना सुरक्षित व जबाबदार वर्तनाची मार्गदर्शनपर शिकवण
कोल्हापूर : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प माध्यमिक विद्यालयात आज कोल्हापूर शहर विभागातील निर्भय पथकाने भेट देत विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले. शाळेतील मुला–मुलींनी निर्भयपणे शिक्षण घेताना शाळेत तसेच समाजात सुरक्षित, सजग आणि जबाबदार पद्धतीने कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भय पथकातील अधिकाऱ्यांनी आत्मविश्वास, सुरक्षितता, कायदेशीर जागरूकता आणि जबाबदार वर्तनाबाबत उपयुक्त माहिती दिली.
या प्रबोधन उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा संदेशही देण्यात आला. मुलांना संबोधित करताना निर्भया पथकातील कोळेकर यांनी सल्ला दिला की— “कृपा करून व्यसनाधीन होऊ नका. आपल्यापेक्षा वयाने मोठे, वाईट प्रवृत्तीचे, व्यसनाधीन किंवा गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती किंवा गट यांच्या सानिध्यात राहणे टाळा. अशा लोकांकडून मिळणारे कोणतेही चुकीचे धडे स्वीकारू नका. शक्यतो इंस्टाग्रामसह इतर सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळावा व व्यसनांपासून दूर राहावे.” या संवेदनशील समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
व्याख्यानादरम्यान कोळेकर यांनी व्यक्त केलेल्या भावनिक मार्गदर्शनामुळे काही विद्यार्थिनींच्या डोळ्यांत पाणी तरळले. “आम्ही समाजात अभिमानाने, निर्भयपणे वावरणार आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी निर्भय पथकाने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. शाळा परिसर अधिक सुरक्षित व जागरूक ठेवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या प्रबोधन कार्यक्रमासाठी निर्भय पथकातील पोलीस उपनिरीक्षक मयेश्वरी खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा गुरव, बाळासाहेब कोळेकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नाली खोत व निशा पाटील उपस्थित होते.
विद्यालयामधून मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, प्रकाश सुतार, शिक्षक रवींद्र पाटील, अवधूत कुलकर्णी, अनिता पाटील, सुषमा सुतार, इंदुमती जाधव आदी मान्यवरांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, सकारात्मक वर्तनाचे महत्व आणि समाजात जबाबदार भूमिका निभावण्याची प्रेरणा आणखीन दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.














