August 3, 2026 5:01 pm

नाट्यकला अकादमीला शासनाचा तन-मन-धनाने पाठिंबा; गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

मुंबई : लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा विशेष गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी मराठी नाट्य परिषदेच्या ‘नाट्यकला अकादमी’ उपक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाकडून तन, मन आणि धनाने भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. तसेच बेस्टच्या काही आगारांमध्ये नाट्यगृहे व चित्रपटगृहे उभारण्याचा मानस व्यक्त करत महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात दरवर्षी होणारी ५ टक्के वाढ थांबविण्याचे आश्वासन दिले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी रंगभूमीशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख करत, “रंगभूमी माझी गुरू, मैत्रीण आणि आयुष्य घडवणारी शक्ती आहे,” असे सांगितले. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी, “भूमिका माणसाला डोळस बनवते आणि पुरस्कार विनम्र बनवतो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले होते. त्यांनी नाट्य परिषद पुढील काळात रंगकर्मींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे सांगितले. रंगमंच कामगार, बुकिंग क्लार्क, व्यवस्थापक व कलावंतांसाठी अपघाती विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या सोहळ्यात “मर्म बंधातली ठेव ही” या विशेष सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. स्वरगंधर्व दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या नाट्यगीतांचे सादरीकरण तसेच स्वरस्वामिनी आशा भोसले यांना संगीतबद्ध आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नाट्य परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय गोखले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारांचे मानकरी
यावेळी व्यावसायिक, संगीत, प्रायोगिक आणि विविध विशेष विभागांतील उत्कृष्ट कलावंत, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक म्हणून ‘कुटुंब किर्रर्रतन’, तर सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक म्हणून ‘बोलविता धनी’ यांची निवड झाली. सर्वोत्कृष्ट अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री पर्ण पेठे, विनोदी अभिनेता आनंद इंगळे, विनोदी अभिनेत्री चेतना भट यांच्यासह अनेक कलावंतांना गौरविण्यात आले.
मराठी रंगभूमीच्या जतन, संवर्धन आणि नव्या पिढीतील कलावंतांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा नाट्यप्रेमी, कलावंत आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, शिवाजी शिंदे, विजय सूर्यवंशी तसेच परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!