स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
जयसिंगपुर येथील लोकहिरा न्यूज वृतसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले होते. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी प्रभावी कारवाई करत सांगली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या इसमास अटक केली आहे.
या कारवाईत आरोपीकडून ०५ किलो गांजा, एक मोबाईल हँडसेट व गांजा विक्रीसाठी वापरण्यात आलेली स्प्लेंडर दुचाकी, असा एकूण १,८२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चिपरी फाटा, जयसिंगपूर परिसरात एक इसम मोटरसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने चिपरी फाटा, जयसिंगपूर येथे सापळा रचला. दरम्यान संशयित इसम स्प्लेंडर मोटरसायकलवरून येताना दिसून आल्यानंतर त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव वैभव राजाराम आवळे (वय २६ वर्षे, रा. मिरज, जि. सांगली) असे सांगितले.
दोन पंचांच्या उपस्थितीत केलेल्या अंगझडतीत आरोपीकडे ०५ किलो गांजा, एक मोबाईल हँडसेट व स्प्लेंडर दुचाकी मिळून आली. सदर गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी वैभव आवळे याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करीत आहे. आरोपी हा सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अॅक्टसह एकूण ८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, राजू कोरे, परशुराम गुजरे, समीर कांबळे, गजानन गुरव, अनिल जाधव यांनी सहभाग घेतला.












