April 17, 2026 9:19 pm

२८ वर्षांनंतर स्वागत कमान जमीनदोस्त! — महापालिकेची जलद कारवाई

  1. कोल्हापूर ( लोकहिरा प्रतिनिधी):

तावडे हॉटेलजवळील २८ वर्षे जुनी स्वागत कमान अखेर महापालिकेच्या बुलडोझरखाली जमीनदोस्त झाली. गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या या कमानीकडे प्रशासनाने अखेर गांभीर्याने पाहत मध्यरात्री बारा वाजता कारवाई सुरू केली.महापालिकेचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. दोन पोकलेन, दोन जेसीबी, सहा डंपर आणि एक बूम मशीन अशा भव्य यंत्रणेचा वापर करण्यात आला. परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर काही युवकांनी रील्स शूटिंगसाठीही गर्दी केल्याने पोलिसांना अतिरिक्त फोर्स बोलवावा लागला.

१९९७ साली उभारलेली ही स्वागत कमान काळाच्या ओघात मोडकळीस आली होती. काँक्रीटचे तुकडे खाली पडू लागल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. अनेक वेळा वाहनांच्या धडका बसल्यानं कमानीचा काही भाग ढासळला होता. विजेच्या तारा आणि दिवे लोंबकळत राहिल्याने परिसर धोकादायक बनला होता.

नागरिक व विविध संघटनांच्या मागणीवरून महापालिकेने अलीकडेच स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल घेतला. त्या अहवालानुसार कमान असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिवाळीनंतर ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामाच्या वेळी महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संपूर्ण रस्ता बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला. तावडे हॉटेल मार्गे शहरात येणारी वाहतूक उचगाव मार्गे वळविण्यात आली, तर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना छत्रपती ताराराणी चौक–कसबा बावडा–सीए मार्गे वळविण्यात आले.

या कारवाईत शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाडगे, उपायुक्त परितोष कंकाल, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, उपशहर अभियंता निवास पवार, वर्कशॉप प्रमुख, अग्निशमन दल, विद्युत विभाग, आरोग्य विभाग व इस्टेट अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कामाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी सांभाळली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!