October 28, 2026 7:11 am

पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

सन्मान निधी, अधिस्वीकृती, आरोग्य योजनांपासून हजारो पत्रकार वंचित; एस. एम. देशमुख यांचा सरकारला थेट सवाल

सांगलीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा उत्साहात; शिवराज काटकर यांनी स्वीकारली राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे

सांगली / लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :


पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी त्याच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पत्रकार सन्मान निधीचा लाभ आतापर्यंत केवळ १२४ पत्रकारांनाच मिळाला असून, त्यापैकी सात ते आठ पत्रकार आज हयात नाहीत. राज्यातील सुमारे ३० हजार पत्रकारांपैकी केवळ तीन हजार पत्रकारांकडे अधिस्वीकृती आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी संरक्षण, पेन्शन आणि आरोग्य योजनांची घोषणा केली जात असली, तरी प्रत्यक्ष लाभ किती पत्रकारांपर्यंत पोहोचतो, हा गंभीर प्रश्न आहे, अशी परखड टीका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम महाराष्ट्र मेळावा, राष्ट्रीय कार्यकारिणी सभा आणि राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेत देशमुख बोलत होते. यावेळी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, अनिल सिंग, मधू नैनन यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर, मावळते अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकार, विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३० हजार पत्रकार; अधिस्वीकृतीधारक फक्त ३ हजार!

पत्रकारांच्या सन्मान निधीची व्याप्ती अत्यंत मर्यादित असून, अधिस्वीकृती मिळवितानाही पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आरोग्य योजना अधिस्वीकृतीशी जोडण्यात आली आहे. राज्यात पत्रकारांची संख्या सुमारे ३० हजार असताना केवळ तीन हजार पत्रकारांकडे अधिस्वीकृती असल्याने हजारो पत्रकार या योजनांपासून वंचित राहत आहेत. सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांकडे केवळ घोषणांच्या माध्यमातून न पाहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने व्यापक आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली.

‘पत्रकार महामंडळाचे चॉकलेट कशासाठी?’

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकार महामंडळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र राज्यात आधीच ७८ महामंडळे असून त्यापैकी अनेक महामंडळांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत पत्रकारांना महामंडळाचे ‘चॉकलेट’ का दाखविले जात आहे?, असा सवाल एस. एम. देशमुख यांनी उपस्थित केला.

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र महामंडळाऐवजी प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर प्रभावी आणि स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असलेली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून पत्रकारांचे प्रश्न एका छत्राखाली सोडवावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. महामंडळांच्या घोषणांमधून पत्रकारांच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असून, पत्रकारांच्या चळवळींचा बुद्धिभेद करून त्यांना नाउमेद करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात संघटनांनी एकजुटीने उभे राहावे

पत्रकारांवर हल्ले झाल्यास पत्रकार संघटनांनी ठामपणे निषेध करून पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ही परिषदेची भूमिका असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका पत्रकाराचा नसून संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे. त्यामुळे पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात संघटनात्मक ताकद उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डिजिटल माध्यमांचे महत्त्व झपाट्याने वाढत असून, बदलत्या माध्यमविश्वाशी जुळवून घेण्यासाठी पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. यासाठी डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘विश्वासार्हता जपा, माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवा’

मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी पत्रकारांनी माध्यमांची विश्वासार्हता जपण्याचे आवाहन केले. कोविडनंतर माध्यम क्षेत्र विविध संकटांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि जबाबदारीची भूमिका कायम ठेवणे गरजेचे आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीत पत्रकारितेच्या नव्या नेतृत्वाला बळ

मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील विविध दैनिकांच्या संपादकांचा सन्मान करण्यात आला. मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व पदाधिकारी व पत्रकारांचा एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, तर कार्याध्यक्षपदी तुकाराम धायगुडे यांची निवड झाली.

डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन राजमाने, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी, तर कार्याध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी यांची निवड झाली. हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव, तर कार्याध्यक्षपदी शैलेश पेटकर यांची निवड करण्यात आली.

तसेच विकास सूर्यवंशी, तानाजी जाधव, कुलदीप देवकुळे, संजय माळी आणि अविनाश कोळी यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन; शोभायात्रेने वातावरण भारावले

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय कार्यकारिणी सभा, पदग्रहण समारंभ, संपादक सत्कार आणि पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

राज्यातील बदलत्या पत्रकारितेच्या स्वरूपावर, डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर तसेच पत्रकारांच्या हक्क आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी पत्रकारांना प्रशिक्षण कार्यशाळेची प्रमाणपत्रे प्रदान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शिवराज काटकर यांच्या हाती राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे!

सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; मिलिंद आष्टीवकर यांनी सोपविला पदभार

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्ह्याला प्रथमच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्याने पत्रकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवराज काटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मावळते राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी शिवराज काटकर यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल आणि पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता व कल्याणासाठी चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्दे

• ३० हजार पत्रकारांपैकी केवळ ३ हजारांकडे अधिस्वीकृती
• पत्रकार सन्मान निधीचा लाभ आतापर्यंत फक्त १२४ पत्रकारांना
• पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी
• पत्रकार महामंडळाऐवजी प्रभावी स्वतंत्र यंत्रणेची मागणी
• पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात संघटनात्मक एकजुटीचा निर्धार
• शिवराज काटकर यांच्या हाती राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!