


रेल्वे कृती समिती कडून जाहिर निषेध; आता सर्वसमावेशक लढा उभारण्याचा इशारा
इचलकरंजी : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी नितीन दबडे
इचलकरंजी-हातकणंगले रेल्वे प्रश्नावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. नियोजित इचलकरंजी-हातकणंगले रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरही आता हा प्रकल्प रद्द होण्याची चर्चा सुरू झाल्याने रेल्वेप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे कृती समितीने खासदार धैर्यशील माने यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जाहिर निषेध व्यक्त केला आहे.
शहराच्या वाढत्या औद्योगिक विस्तारासाठी इचलकरंजीला रेल्वेने जोडण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे कृती समितीने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, समितीच्या म्हणण्यानुसार, वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे येथे रेल्वे प्रकल्पासंदर्भात राज्यातील अनेक खासदारांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बैठकीत अनेक खासदारांनी आपल्या जिल्ह्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली; मात्र इचलकरंजीच्या रेल्वे प्रश्नावर अपेक्षित पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप रेल्वे कृती समितीने केला आहे.
रेल्वे प्रकल्प रद्द होणार असल्याची बातमी समोर येताच इचलकरंजी शहरात खळबळ उडाली. त्यानंतर रेल्वे कृती समितीची तातडीची बैठक निमंत्रक अजय जाधव (आबा) यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी खासदारांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
यापुढे केवळ निवेदने आणि पाठपुराव्यावर न थांबता शहरातील सर्व उद्योजक, व्यापारी, सार्वजनिक मंडळे आणि रेल्वेप्रेमींना सोबत घेऊन रस्त्यावरची निर्णायक लढाई उभारण्याचा इशारा रेल्वे कृती समितीने दिला आहे.
इचलकरंजीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या चर्चेने आता नागरिकांच्या संतापाला उधाण आले असून, आगामी काळात या प्रश्नावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








