October 28, 2026 6:15 am

महिलेसोबतचा वाद सोडविण्यास गेलेल्या मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीत मॅनेजरचा दगडाने ठेचून खून

शहापूर

शहापूर पोलिसांनी व एलसीबी च्या टीमने यड्राव मधील खुनातील संशीयताना ताब्यात घेतले आहे

लोकहिरा न्यूज प्रतिनिधी राजू टिळंगे : यड्राव (ता. । शिरोळ) येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधील हॉटेल अॅकॉर्ड इंटरनॅशनलच्या बाहेर महिलेसोबत सुरू असलेला वाद सोडविण्यास गेलेल्या हॉटेल मॅनेजरवर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २२) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मॅनेजरचा मृत्यू झाला. अल्बर्ट हॅरीबेनी एम्ब्रोस (वय ५३, रा. समतानगर, मिरज, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे.

 

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४३४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल अॅकॉर्ड इंटरनॅशनलचे मालक प्रसाद शुभन्ना शेट्टी (वय ५८, व्यवसाय हॉटेल, रा. तिरंगा चौक, पुजारी मळा, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. मृत अल्बर्ट एम्ब्रोस हे संबंधित हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

शनिवारी रात्री हॉटेलच्या बाहेर गंगा प्रविण पाटील (वय २१, रा. यड्राव) आणि अशपाक सिकंदर नदाफ (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) हे एका महिलेसोबत वाद घालत असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार पाहून अल्बर्ट एम्ब्रोस हे वाद मिटविण्यासाठी गेले. त्यावेळी वाद वाढून मारामारी झाली.

पोलिसांच्या नोंदीनुसार, यावेळी आरोपी क्रमांक एक गंगा पाटील याने अल्बर्ट यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील हॉटेलबाहेर घडलेल्या या खुनाच्या घटनेने यड्राव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या मॅनेजरचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या हल्ल्यामागील नेमके कारण, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींची भूमिका याबाबतचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!