इचलकरंजी लोकहिरा न्यूज 


प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) इचलकरंजी शाखा आणि इचलकरंजी नागरिक मंच (इनाम) यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी एस.टी. बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. “हिरवी पृथ्वी, निरोगी स्मितहास्य” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक सागर पाटील तसेच इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियान नोडल अधिकारी उमेश कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नगरसेविका अरुणा बचाटे आणि प्रमोद बचाटे यांनी पुढाकार घेत महानगरपालिकेमार्फत वृक्षारोपणासाठी आवश्यक झाडे उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमास नगरसेविका ध्रुवती दळवाई यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच राम आडकी, अतीत आडकी आणि हिरामणी आडकी यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. महेंद्र शहा, नोडल अधिकारी उमेश कांबळे आणि इनामचे अध्यक्ष अभिजित पटवा यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन केले. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन राखणारे महत्त्वाचे घटक असून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात आयडीए इचलकरंजी शाखेचे डॉ. शुभम छाजेड, डॉ. प्रियांका जाधव, स्वाती महेंद्र शहा यांच्यासह इनामचे राजू कोन्नूर, शीतल मगदूम, प्रसाद कुलकर्णी, उमेश पाटील, हरीश देवाडिगा, विद्यासागर चराटे, दीपक जाधव, दीपक पंडित, महेंद्र जाधव, अमोल ढवळे, अमित बियाणी, रोहित पालके, शुभम व्यास, सुप्रिया माने, अनिता दळवी, मीना कासार आदी सहभागी झाले.
वृक्षारोपणासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. एस.टी. महामंडळाच्या वतीने आगार व्यवस्थापक सागर पाटील, वाहतूक निरीक्षक शिवाजी धारवट, वरिष्ठ लिपिक परेश पै व चंदू जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक वाहतूक निरीक्षक शिवाजी धारवट यांनी उपस्थितांचे आभार मानले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला. 🌱🌳🌿













