पोलीस वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पोलीस मित्रत्वाचे धडे
हालोंडी (ता. हातकणंगले) : लोकहिरा वृतसेवा
पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी आदर निर्माण व्हावा तसेच पोलीस व विद्यार्थी यांच्यातील मैत्री अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिला दक्षता विभागाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन व निर्भया पथकाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी रोजी राजेंद्र विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, हालोंडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस खात्यातील विविध विभाग, त्यांचे कार्य, पोलीस ठाण्याची रचना व कर्तव्यांची माहिती देण्यात आली. तसेच शालेय वयात येणाऱ्या चांगल्या-वाईट प्रसंगांना कसे सामोरे जावे, वेळीच सावधगिरी कशी बाळगावी, व्यसनाधीनतेपासून दूर कसे राहावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुलींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, मोबाईल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या वापराबाबत घ्यावयाची काळजी याविषयीही जागरूक करण्यात आले. कोणताही त्रास किंवा अडचण उद्भवल्यास पालक, शिक्षक किंवा निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच तात्काळ मदतीसाठी डायल ११२ किंवा १०९१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मी टीचर यांनी मनोगत व्यक्त करताना, “कोल्हापूर पोलीस दलाने आमच्या शाळेमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने हा उपक्रम राबवला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी आदर, जवळीक आणि मैत्रीची भावना निर्माण होऊन मुला-मुलींमध्ये जागरूकता वाढेल तसेच त्यांचे मनोधैर्य निश्चितच बळकट होईल. 




असे उपक्रम वेळोवेळी राबवून आम्हाला मार्गदर्शन करत राहावे,” अशी अपेक्षा व्यक्त करत संपूर्ण कोल्हापूर पोलीस दलाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन दिलीप पाटील, सेक्रेटरी गुंडाजी पाटील, मुख्याध्यापिका लक्ष्मी मॅडम, ॲडमिनिस्ट्रेशन अभय सर, शिक्षकवर्ग, सेवकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.












