लोकहिरा न्यूज प्रतिनिधी :- गणेश नारायणकर
जुनाराजवाडा पोलीस ठाणे हद्दीत गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर १ डिसेंबर रोजी पहाटे एका युवकाचा खुन झाल्याची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून अवघ्या सहा तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयिताला तात्काळ ताब्यात घेत कारवाई केली.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रिक पोलजवळ एका युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास तपास पथके तयार करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे तपासून संशयिताचा शोध सुरू केला.
दरम्यान, पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना संशयित मनिष जालिंदर राऊत (रा. कळंबा रिंग रोड, कोल्हापूर) यानेच खुन केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने तात्काळ परिसरात शोधमोहीम राबवून मनिष राऊतला ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने ओळखीतील सिद्धू शंकर बनवी याच्यासोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांना सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तपास पथकात साहेब पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचा स्टाफ सहभागी होता.












