October 28, 2026 6:12 am

इचलकरंजी विभागात चार पथके कार्यरत; मिरवणूक मार्गावरील विद्युत यंत्रणेची विशेष तपासणी

विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची २४ तास यंत्रणा सज्ज

इचलकरंजी विभागात चार पथके कार्यरत; मिरवणूक मार्गावरील विद्युत यंत्रणेची विशेष तपासणी

इचलकरंजी : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वीजपुरवठ्याची अखंडता लक्षात घेऊन इचलकरंजी महावितरण विभागाने विशेष नियोजन केले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही विद्युत समस्या उद्भवू नये, तसेच समस्या निर्माण झाल्यास ती तातडीने दूर करता यावी, यासाठी महावितरणची यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे.

इचलकरंजी विभागांतर्गत चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच सुंदर बाग येथील महावितरण कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आला आहे.

मिरवणूक मार्गावरील शिवाजी पुतळा, संभाजी पुतळा, गांधी पुतळा आणि महासत्ता चौक या प्रमुख ठिकाणी महावितरणची पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय विविध उपकेंद्रे तसेच नदी परिसरातही स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्गावरील सर्व पोल व स्टेंना कोटिंग

महावितरणच्या यंदाच्या विशेष तयारीतील महत्त्वाची बाब म्हणजे विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व विद्युत खांब आणि त्यांच्या स्टेंना कोटिंग करून घेण्यात आले आहे. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणूक मार्गावरील विद्युत यंत्रणेची विशेष तपासणी करण्यात आली असून, आवश्यक प्रतिबंधात्मक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

याशिवाय मिरवणूक मार्गावरील DTC 4710389 वरील सर्व सर्किट बॉक्सचे फ्यूज बदलण्यात आले आहेत. संभाव्य विद्युत बिघाड टाळण्यासाठी तसेच मिरवणुकीदरम्यान नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे करण्यात आली आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असल्याने विद्युत यंत्रणेची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

कार्यकारी अभियंता श्री. गोंदील, इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष यंत्रणा कार्यरत असून, विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या या पूर्वतयारीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

— पत्रकार नितीन दबडे
साप्ताहिक लोकहिरा न्यूज

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!