October 28, 2026 7:24 am

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी एकमताने निवड; सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर संघटनात्मक लढ्याचा निर्धार

चर्मोद्योगाशी संबंधित सर्व जातींना एकत्र आणणार : बाबुराव म्हेत्रे

सोलापूर, लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-

मोची (मादिगा), चांभार, ढोर, खाटीक, होलार यांच्यासह चर्मोद्योगाशी संबंधित सर्व जातींची सामाजिक व आर्थिक नाळ एकच असून, या समान धाग्याच्या आधारे सर्वांना संघटित करण्याचा क राष्ट्रीय चर्मकार संघाचे नवनिर्वाचित सोलापूर शहराध्यक्ष बाबुराव म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी बाबुराव म्हेत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर झालेल्या सत्काराला उत्तर देताना म्हेत्रे यांनी शहरातील प्रत्येक मोहल्ला, वस्ती, गल्ली आणि झोपडपट्टीत जाऊन समाजबांधवांशी संवाद साधण्याची भूमिका मांडली.
शैक्षणिक अडथळे, खासगीकरणामुळे वाढलेली बेरोजगारी, दारिद्र्य, नैराश्य, व्यसनाधीनता, कंत्राटी रोजगारातील शोषण तसेच जातीय विषमता आणि सामाजिक भेदभाव या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनासाठी चर्मोद्योगाशी संबंधित सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे, असेही म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष शाहीर रमेश खाडे यांनी चर्मकार समाज आजही मोठ्या प्रमाणावर असंघटित, शोषित व वंचित असल्याचे सांगितले. जिल्हाभर संविधान प्रबोधन करून सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांसाठी जनजागृती करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचाराने सर्व पोटजातींना एकत्र करून संघटित शक्ती उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारतीय संविधान प्रबोधन समिती, सोलापूरचे अध्यक्ष फारुख शेख यांनीही सामाजिक विषमता, बेरोजगारी, महागडे शिक्षण आणि जातीय द्वेष यांसारख्या प्रश्नांवर भाष्य केले. भारतीय संविधानाचे संरक्षण आणि देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संविधान प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीस रामस्वामी मनलोर, सच्चिदानंद व्हटकर, तुकाराम कांबळे, श्रीकृष्ण लोंढे, नरसिंगस्वामी यट्टम, ‘भुईकोट’चे संपादक संजय घोलप, बसवराज संगेपाग, महादेव व्हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संघटनेची ताकद वाढविण्यासाठी लवकरच आणखी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असून, सोलापूर शहरासह विविध भागांत बैठका व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सच्चिदानंद व्हटकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!