October 28, 2026 6:12 am

दीप अमावस्येच्या मंगल प्रकाशात ‘स्वच्छ विद्यालय–स्वस्थ विद्यार्थी–सुंदर इचलकरंजी’ अभियानाचा जागर

‘तमसो मा ज्योतिर्गमय’च्या संदेशातून स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प

 

इचलकरंजी :लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-नितीन दबडे
श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्री नाकोडा हिंदी विद्यामंदिर एवं हायस्कूल येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ विद्यालय–स्वस्थ विद्यार्थी–सुंदर इचलकरंजी’ या पर्यावरणपूरक अभियानाचे आयोजन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आले. विशेष म्हणजे आज दीप अमावस्या असल्याने भारतीय संस्कृतीतील प्रकाशपूजेच्या मंगल परंपरेला उजाळा देत दीपप्रज्वलनाने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

दीप अमावस्येच्या पवित्र पर्वावर प्रज्वलित झालेल्या दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर जणू स्वच्छता, संस्कार आणि ज्ञानाचा संदेश देत उजळून निघाला. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या उपनिषदातील उदात्त विचाराचा आशय विद्यार्थ्यांनी कृतीतून आत्मसात केला. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे जाण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी दीपांच्या साक्षीने केला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सुंदर इचलकरंजी घडविण्याची सामूहिक प्रतिज्ञाही घेतली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री नाकोडा हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वि. ह. सपाटे सर यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. स्वच्छता ही केवळ एखाद्या दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘स्वच्छ विद्यालयातून स्वच्छ विचार, स्वच्छ विचारांतून निरोगी विद्यार्थी आणि निरोगी विद्यार्थ्यांतून सुंदर समाज’ ही संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इचलकरंजी महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. संग्राम भोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छतेची सुरुवात सर्वप्रथम आपल्या घरापासून आणि स्वतःपासून झाली पाहिजे, असे आवाहन केले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध स्वच्छता उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्वच्छता ही केवळ परिसर सुंदर ठेवण्याची बाब नसून ती उत्तम आरोग्य, निरोगी जीवन आणि सामाजिक जबाबदारीशी निगडित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

स्वच्छता निरीक्षक श्री. जयदीप शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा यांचे योग्य वर्गीकरण कसे करावे, याचे त्यांनी मार्गदर्शन केले. घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन तसेच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तूंची निर्मिती करून पर्यावरण संवर्धनाला हातभार कसा लावता येईल, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुरेश कुमारजी ललवाणी यांनी ‘स्वच्छ भारत–सुंदर भारत’ या व्यापक संकल्पनेचा संदर्भ देत स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या आरोग्याचे आणि स्वच्छतेचे खरे शिल्पकार म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘स्वच्छता ही केवळ सवय नसून जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे’, असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संस्कार आपल्या जीवनात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी परिसराच्या स्वच्छतेसाठी उत्कृष्ट कार्य करणारे श्री. रवींद्र हेगडे यांचा त्यांच्या उल्लेखनीय स्वच्छता कार्याबद्दल श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला.

यावेळी स्वच्छता निरीक्षक श्री. शशिकांत गुगळे संस्थेचे संचालक श्री. संकेशजी ललवाणी यांची विशेष उपस्थिती लाभली , या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. एस. जी. काटे मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, महानगरपालिका अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

दीप अमावस्येच्या पावन पर्वावर प्रज्वलित झालेला प्रत्येक दीप केवळ अंधार दूर करणारा नव्हता, तर तो स्वच्छतेचा संस्कार, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि उज्ज्वल भविष्याची आशा प्रज्वलित करणारा होता. ‘हर घर तिरंगा’च्या देशभक्तीपूर्ण भावनेला स्वच्छतेची आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत ‘स्वच्छ विद्यालय–स्वस्थ विद्यार्थी–सुंदर इचलकरंजी’ या अभियानातून विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी भारताच्या निर्मितीचा प्रेरणादायी संकल्प केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!