


कोल्हापूर : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी
गेल्या १५ वर्षांपासून कचरावेचकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अवनि संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कचरावेचकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याबाबतचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. रविकांत अडसुळे यांना देण्यात आले.
अवनि संस्थेच्या माहितीनुसार, शहरातील कचरावेचक दररोज ३०० किलोहून अधिक विक्रीयोग्य प्लास्टिक आणि इतर पुनर्वापरयोग्य कचरा गोळा करतात. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवर जाणारा कचरा कमी होण्यास मदत होत असून पर्यावरण संरक्षणात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पुनर्वापर प्रक्रियेला चालना देण्यातही कचरावेचकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी कचरावेचकांच्या पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या :
शहरातील सर्व कचरावेचकांची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे.
NSKFDC च्या ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत कचरावेचकांना ड्राय वेस्ट संकलन युनिट उपलब्ध करून द्यावे.
कचरावेचकांना हॅन्ड ग्लोज, मास्क, बूट आदी सुरक्षा साहित्य देण्यात यावे.
कचरा वर्गीकरण व डोअर-टू-डोअर संकलनाच्या कामांमध्ये कचरावेचकांचा समावेश करावा. तसेच २०२६ च्या नियम ३९(२) नुसार त्यांना प्राधान्य द्यावे.
१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन नियमांबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करावे.
कचरावेचकांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांना वर्षातून दोन वेळा धनुर्वात (टिटॅनस) प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कचरावेचकांचे पर्यावरण संवर्धनातील योगदान लक्षात घेऊन या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना कचरावेचक संघटना कोल्हापूरच्या संगिता लोंढे, बनाबाई कांबळे, मंगल कांबळे, भारती गोसावी, सुनिता मलिक, दिलशा जमादार तसेच अवनि संस्थेचे प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते.













