साप्ताहिक लोकहिरा न्यूज वृत्तसेवा:-
कोल्हापूर जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी विभागाने धडाकेबाज कारवाई करत मंडळ अधिकारीसह एका खाजगी व्यक्तीस ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मंडळ अधिकारी अमितकुमार जगन्नाथ पाडळकर आणि त्यांचा साथीदार शिवाजी आनंदराव जाधव यांनी कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती.
तक्रारीची पडताळणी करताना आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर ६० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी मंडळ अधिकारी पाडळकर यांनी ही रक्कम खाजगी व्यक्ती शिवाजी जाधव याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने क्षणार्धात दोघांनाही रंगेहाथ पकडले.
या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून, सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठीही लाच द्यावी लागत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व ७ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करीत आहेत.













