


हुपरी लोकहिरा न्यूज प्रतिनिधी;- शहाबुद्धीन घुडूभाई
मुंबई येथे रविवारी (दि. ८ फेब्रुवारी २०२६) आयोजित ‘सी.टी.ई.टी.’ परीक्षेदरम्यान सुरक्षा तपासणीच्या नावाखाली हिंदू सुवासिनी (शिक्षिका) यांना त्यांचे मंगळसूत्र व इतर दागिने उतरविण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करत अखिल भारत हिन्दू महासभा पक्षाच्या वतीने हुपरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित शिक्षिकांनी विरोध न करता परीक्षा दिली; मात्र या कृतीमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून महिलांच्या सन्मानालाही धक्का बसला आहे. हिंदू धर्मात मंगळसूत्र हे श्रद्धा, परंपरा आणि वैवाहिक पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत जबरदस्तीने ते उतरविण्यास सांगणे निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे.भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकाला धर्माचे पालन व आचरण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. परीक्षा प्रक्रियेच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच परीक्षार्थींना मौल्यवान दागिने उघड्यावर ठेवण्यास भाग पाडणे ही सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर निष्काळजीपणाची बाब असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी परीक्षा केंद्र प्रमुख व जबाबदार कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, तसेच दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास जनतेत तीव्र असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे,शहर प्रमुख संजय पाटील, सुहास माने,निळकंठ माने, संतोष पाटील, प्रशांत साळुंखे, यशवंत तळेकर, नितीन काकडे,राजेंद्र उगळे, संदीप भंडारे, महादेव आडावकर,दादासाहेब कामते,संतोष परीट, सचिन माळी,ओमकार जांभळे, सचिन सादळे, शिवाजी थोरात, गजानन सव्वाशीरे, गणेश शिंत्रे, निलेश कदम,या वेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













