जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी
जयसिंगपूर : शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना


शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास घडली. जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच उदगाव (ता. शिरोळ) येथील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. पोलीस ठाण्याच्या अगदी समोर हा प्रकार घडूनही काही काळ गोंधळ सुरू राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनुसार, वादाचे रूपांतर अचानक मारहाणीत झाले. एकाने दुसऱ्याला पकडून जमिनीवर आपटल्याचे दृश्य दिसून आले. तसेच हाणामारीत महिलांनाही लक्ष्य करण्यात आले; काही महिलांचे केस ओढून रस्त्यावर फेकल्याचे प्रकार घडल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे रस्त्यावर गर्दी जमली होती.
पोलीस ठाण्याच्या समोरच अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाचा धाक नागरिकांत राहिला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. घटनेनंतर पोलीसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या प्रकरणी नेमकी कारवाई काय होणार, दोषींवर गुन्हे दाखल होणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.













