२७, २८, २९ नोव्हेंबरला तीन दिवसीय विचार, साहित्य आणि संस्कृती महोत्सव
पुणे : लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:- निवास नवघरे

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील **‘महात्मा फुले फेस्टिवल’**चे आयोजन पुणे येथे २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणारा हा तीन दिवसीय महोत्सव विचार, साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर ठरणार आहे.
या फेस्टिवलमध्ये देशभरातील विचारक, भाष्यकार, अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, कृतीवंत तसेच ‘जेन झी’ आंदोलनातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
पुस्तक प्रदर्शनापासून टॉक शोपर्यंत विविध उपक्रम
फेस्टिवलमध्ये पुस्तक प्रदर्शन, जेन झी आंदोलनातील तरुणांच्या पोस्टरचे प्रदर्शन, तरुण व्यंगचित्रकारांचे लाईव्ह व्यंगचित्र प्रदर्शन, संविधान दालन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध सामाजिक व समकालीन विषयांवर टॉक शो, मुलाखती, व्याख्याने, नाटक, गाणी आणि कविता सादरीकरण होणार आहे.
‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ हा विशेष उपक्रमही फेस्टिवलचे आकर्षण ठरणार असून, प्रकाशकांच्या पुस्तक दालनातून साहित्यप्रेमींना विविध पुस्तकांशी आणि लेखकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर
महात्मा फुले जन्म द्विशताब्दी, महाड चवदार तळ्याची शताब्दी, मनुस्मृती दहन शताब्दी आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाला १२५ वर्षे या ऐतिहासिक संदर्भांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दलाकडून वर्षभर ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’ देशभर साजरे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात हा महत्त्वपूर्ण विचार, साहित्य आणि संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची संमेलन समितीत निवड
फेस्टिवलसाठी स्थापन करण्यात आलेल्या संमेलन समितीत लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, राजन गवस, प्रवीण बांदेकर, नीरज हातेकर, अलीम वकील, अरुण म्हात्रे, ज्ञानेश महाराव, निशिकांत कोलगे, आशालता कांबळे, विनोद शिरसाठ, लक्ष्मण यादव, हुबनाथ पांडे, प्रकाश दुबे, प्रदीप दाते, किशोर ढमाले, सुबोध मोरे, प्रतिमा परदेशी, सोमनाथ रोडे, सरफराज अहमद, सूरज येंगडे, जयवंत पाटील, अजित शिंदे आणि राजा कांदळकर यांचा समावेश आहे.
विशेष निमंत्रित म्हणून कपिल पाटील, सुभाष वारे, अंजली आंबेडकर, अभिजित वैद्य आणि नितीन वैद्य यांचा समावेश करण्यात आला आहे.
सूचना व सहभागासाठी आवाहन
फेस्टिवलचे स्वरूप अधिक व्यापक आणि लोकाभिमुख करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना व्हॉट्सॲपद्वारे कळवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
फेस्टिवलमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क :
रोहित ढाले – ९८६९८१९८७८
सागर भालेराव – ९९६७०५५६३०
प्रशांत इंगळे – ९४२०८८९८६२
अभिजित आंब्रे – ८६०५४००३७३
“चला, फुले विचारांनी समाज परिवर्तन घडवूया!” या प्रेरणादायी संदेशासह होणारा हा महोत्सव सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रभावी जागर ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








