October 28, 2026 8:18 am

 एम.डी. ड्रग्ज बनविणारा कारखाना उद्ध्वस्त; 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त.

कोल्हापूर : लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात कारवाईची मोहीम तीव्र झाली असताना, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज निर्मितीचा संशयित कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एम.डी. तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारे रसायने, प्रयोगशाळेतील साहित्य आणि यंत्रसामग्री असा तब्बल 1 कोटी 13 लाख 51 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या NDPS कायद्याच्या कलम 8(क), 21(क), 22(क), 29 तसेच BNS कलम 238, 111 अन्वये गुन्ह्याच्या तपासादरम्यान या कारवाईचा धागा कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला.
तपासात अटक करण्यात आलेला आरोपी इरफान सलीम खान, रा. मिरारोड, ठाणे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने पुढील तपास सुरू केला. या तपासात चंदगड तालुक्यातील हाजगोळी परिसरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये एम.डी./मेफेड्रॉन ड्रग्ज निर्मितीसाठी कारखाना उभारण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन बोधे व पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सुमारे 208 ग्रॅम तयार एम.डी., कच्चे रसायन, 2-Bromo Chemical Powder, Monomethyl Amine 40 टक्के असलेले सुमारे 70 लिटर रसायन, तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य आणि उपकरणे आढळून आली.यामध्ये फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनता मापक, टेस्ट ट्यूब्स, काचेच्या एअरटाइट लॅबोरेटरी जार, इंडिकेटर पेपर, कापडी हँड ग्लोव्हज, स्पीड कंट्रोलर रेग्युलेटर, ओव्हन, टेस्टर, मिक्सिंग मोटर व स्टँडिंग सेट यासह इतर साहित्याचा समावेश आहे.या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थांची निर्मिती करण्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तयार ड्रग्जसोबत मोठ्या प्रमाणात रसायने आणि उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे जप्त झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.दरम्यान, ही कारवाई अपर पोलीस महासंचालक, सी.आय.डी. पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य पुणे, पोलीस उपमहानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पोलीस अधीक्षक (कृती), पोलीस अधीक्षक (प्रशासन) तसेच अपर पोलीस अधीक्षक (कृती), महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.अमली पदार्थांच्या काळ्या साम्राज्यावर पोलिसांचा हा मोठा प्रहार मानला जात असून, या ड्रग्ज निर्मितीच्या रॅकेटमागे आणखी कोण कोण सहभागी आहेत, ड्रग्ज कुठे आणि कोणाला पुरविले जात होते, तसेच आर्थिक व्यवहारांची साखळी किती मोठी आहे, याचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!