August 3, 2026 6:27 pm

सायबर गुन्हेगारांचे ‘म्युल बँक अकाउंट’ रॅकेट उघड; अनेकांवर गुन्हा दाखल, कोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई!

कोल्हापूर :लोकहिरा न्यूज वृत्तसेवा

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल बँक अकाउंट’ रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत कोल्हापूर सायबर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांमधून फिरवून पुरावे नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खातेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया, कमिशनचे आमिष किंवा इतर माध्यमांतून नागरिकांची बँक खाती वापरून घेतात. या खात्यांमध्ये फसवणुकीची रक्कम जमा करून ती तत्काळ इतर खात्यांमध्ये वर्ग केली जाते. अशा खात्यांना ‘म्युल बँक अकाउंट’ असे संबोधले जाते.
कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या रॅकेटचा माग काढला. तपासादरम्यान काही व्यक्तींनी आपल्या खात्यांचा वापर करून घेतल्याचे निष्पन्न झाले. खात्यातून होणाऱ्या व्यवहारांवर कमिशन घेऊन आर्थिक लाभ मिळवल्याची माहितीही पुढे आली आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने अनेक नागरिकांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली. फसवणुकीतून आलेली रक्कम विविध खात्यांमध्ये वळवून त्याबदल्यात प्रति व्यवहार मोठ्या प्रमाणात कमिशन घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 376/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316, 318(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीला कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊ नका. अशा व्यवहारांमुळे आपणही सायबर गुन्ह्यात आरोपी ठरू शकता.
“कमिशनच्या मोहापायी खाते दिले तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते; सायबर पोलिसांचा इशारा!”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!