तारदाळ : लोकहिरा न्यूज वृत्तसेवा


गावात जुन्या वादातून घरात घुसून फायटरने हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण गाव संतप्त झाले असून “गावात गावगुंडांना थारा देणार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व पक्षीय बैठक पार पडली. बैठकीत गावातील शांतता बिघडवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावातील नागरिक, युवक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच गावात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची गावातून धिंड काढण्याचा ठरावही बैठकीत करण्यात आला. “गावात कायदा हातात घेणाऱ्यांना माफी नाही,” असा संतप्त सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला.दरम्यान, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत तारदाळ आणि खोतवाडी या दोन्ही गावांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी विशेष क्यूआर कोड व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नागरिकांना कोणतीही घटना, गुंडगिरी किंवा संशयास्पद प्रकार थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता यावेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तसेच सदर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. गावकऱ्यांनी मात्र एकजुटीने गुंडगिरीविरोधात उभे राहत तारदाळ व खोतवाडी गावातून नशीले पदार्थ विक्री करणारे,नशिले पदार्थ जे सेवन करून गाव गुंडगिरी करणारे फाळकूट दादा यांचा यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर व ग्रामपंचायतची वतीने जे काही प्रतिबंधक कारवाई करायला लागेल ते सर्व करण्याची तयारी दर्शविली आहे.













