प्रतिनिधी ;-


संभाजी चौगुले
हातकणंगले तालुक्यातील हेरले
येथील क्रीडा मंडळाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या शिरीष पावलस चौगुले यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. मंडळाचे माजी उत्कृष्ट कबड्डी खेळाडू व निवृत्त शिक्षक पावलस चौगुले यांचे चिरंजीव असलेल्या शिरीष यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, हितचिंतक तसेच नवोदित बालचिमुकल्या खेळाडूंच्या उपस्थितीत शिरीष चौगुले यांचा मान–सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशामागे मोलाची साथ आणि खंबीर पाठिंबा देणारे त्यांचे आदरणीय वडील पावलस चौगुले यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत ज्येष्ठ खेळाडू बाबासाहेब कोळेकर यांनी मांडले. त्यांनी शिरीष चौगुले यांच्या जिद्दीचे कौतुक करत ग्रामीण भागातील तरुणांसाठी ते प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले. सत्कारमूर्ती शिरीष व पावलस चौगुले यांचा सन्मान मंडळाचे ज्येष्ठ आधारस्तंभ केशवराव मिरजे (आबा) यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच हेरले वडार समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय खेळाडू विनोद आनंदराव वड्ड यांचा देखील सन्मान करण्यात आला. हा सत्कार ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू भरत कराळे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमात मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू बाबासाहेब कोळेकर यांनी पोलीस दलात बजावलेल्या कर्तव्याबरोबरच विशेष कामगिरीबद्दल प्राप्त झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख करून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिरीष चौगुले यांच्या यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी मंगलकामना केल्या. जुन्या आठवणींना उजाळा देत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचा लाडका खेळाडू व कृषी पर्यवेक्षक नारायण कटकुळे यांनी केले.
या सोहळ्यामुळे हेरले क्रीडा मंडळाच्या परंपरेला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.












