लोकहिरा न्यूज प्रतिनिधी:-
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या पार्श्वभूमीवर अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी गोकुळशिरगाव परिसरात मोठी कारवाई केली आहे.
पोलीस ठाणे हद्दीतील म्हसोबा माळवाडी येथे राहणाऱ्या विनायक मोहन पाटील (वय 29, रा. म्हसोबा माळवाडी, गोकुळशिरगाव, ता. करवीर,) यास गांजा या अंमली पदार्थाची चोरटी विक्री करत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून 2 किलो 800 ग्रॅम वजनाचा गांजा तसेच मोबाईल हँडसेटसह एकूण 66 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावर तात्काळ छापा कारवाई करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
पोलिस तपासात आरोपी हा गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय व स्थानिक कामगारांना गांजाची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीविरुद्ध गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापूर्वीही त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झालेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास गोकुळशिरगाव पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, अरविंद पाटील, गजानन गुरव, संजय हुंबे, अशोक पवार, अनिल जाधव, राजेश राठोड व महादेव कुहाडे यांचा सहभाग होता.












